Sunday, March 15, 2026

भालोद येथे कृषीदूतांकडून प्रगतशील शेतकरी दीपक चौधरींच्या यशोगाथेचे संकलन १.८ किलोचा विक्रमी पेरू, एक्सपोर्ट क्वालिटी केळी व विषमुक्त शेतीचा वेध


भालोद, ता. यावल । वार्ताहर

जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांच्या माध्यमातून रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत भालोद (ता. यावल) येथील प्रगतशील शेतकरी दीपक सुधाकर चौधरी यांच्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण यशोगाथेचे नुकतेच संकलन व सादरीकरण करण्यात आले.

सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रो. बी. एम. गोणशेटवाड आणि कार्यक्रम अधिकारी प्रो. एन. बी. सदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी कृषीदूतांनी 'अमृत उद्यान रत्न' आणि 'आदर्श शेतकरी' पुरस्कार प्राप्त दीपक चौधरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी विशेष संवाद साधला व त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

श्री. चौधरी यांनी 'व्हीएनआर' (VNR) जातीच्या पेरूची लागवड करून योग्य छाटणी व 'बॅगिंग' तंत्राच्या माध्यमातून तब्बल १.८ किलो वजनाचा विक्रमी पेरू पिकवण्याची किमया साधली आहे. तसेच सध्या त्यांच्या शेतात २०,००० जैन टिशू कल्चर केळीची शास्त्रशुद्ध लागवड आहे. 'फ्रूट केअर मॅनेजमेंट' अंतर्गत 'बड इंजेक्शन' व बॅगिंगचा वापर करून ते डागविरहित आणि एक्सपोर्ट क्वालिटी (निर्यातक्षम) केळीचे उत्पादन घेतात. त्यांची ही दर्जेदार केळी थेट काश्मीर व उत्तर भारतातील बाजारपेठेत निर्यात होते. याव्यतिरिक्त त्यांनी ५ एकर क्षेत्रात एकाच वेळी १६ प्रकारच्या विषमुक्त (Residue-free) भाज्यांचे यशस्वी उत्पादन घेऊन कृषी क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी संवाद साधताना श्री. चौधरी यांनी सांगितले की, "सध्या बाजारात उत्पादनाच्या प्रमाणापेक्षा (Quantity) मालाच्या दर्जाला (Quality) सर्वाधिक मागणी आहे. तसेच, जमिनीचा पोत व सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासाठी शेतातील उर्वरित पालापाचोळा व बायोमास पुन्हा जमिनीतच मिसळणे काळाची गरज आहे." सदर यशोगाथेचे प्रत्यक्ष चित्रीकरण, सादरीकरण व संकलन कृषीदूत भावेश पांडव याने केले. या माध्यमातून परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीची प्रेरणा मिळणार आहे.

भालोद येथे कृषीदूतांकडून प्रगतशील शेतकरी दीपक चौधरींच्या यशोगाथेचे संकलन १.८ किलोचा विक्रमी पेरू, एक्सपोर्ट क्वालिटी केळी व विषमुक्त शेतीचा वेध

भालोद, ता. यावल । वार्ताहर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांच्या माध्यमातून रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत भालोद (ता...